दि. ६ फेब्रुवारी १९७७ रोजी थेरगाव येथे जन्मलेल्या, काळूरामजी बारणे यांच्यावर विठ्ठलभक्ती, वारकरी संप्रदायाची समतेची-बंधुतेची शिकवण आणि धार्मिकतेचे संस्कार झाले. त्यांचे वडील गोपाळराव बारणे हे हाडाचे शेतकरी. आपली अम्युनेशन फॅक्टरी मधील नोकरी सांभाळून आपली शेती-वाडी त्यांनी जपली आणि वाढवली सुद्धा..!!
गोपाळराव यांनी विठ्ठलभक्तीची कास धरत कार्याला-धर्माची जोड दिली आणि थेरगाव येथील १६ नंबर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी केली. कालांतराने रस्ता रुंदीकरणात, विठ्ठल मंदिर हटवावे लागले. त्यामुळे, सध्या काळूरामजी बारणे यांच्या जुन्या निवासस्थानी क्रांतिवीरनगर, थेरगाव येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे मंदिर स्थपिले आहे.
अश्या बंधुभाव जपणाऱ्या कुटुंबातून पुढे आल्याने, काळूराम बारणे यांचा 'लोकसंग्रह' हाच सामाजिक तथा राजकीय जीवनप्रवासाचा गाभा राहिला आहे. आपले प्राथमिक शिक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव प्राथमिक विद्यालयातून तर महाविद्यालयीन शिक्षण महात्मा फुले महाविद्यालयातून त्यांनी पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताच नोकरीच्या मागे न धावता, उद्योग-व्यवसात काळूरामजी बारणे यांनी लक्ष घातले. तत्कालीन पिंपरी चिंचवड शहर आणि त्याच्या आजूबाजूची गावे विस्तारत होती. त्यामुळे, त्यानुसार त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरू करून, त्यांनी छोटी-मोठी कामे स्वतःच्या मेहनतीने मिळवली, व्यवसायात सचोटी, चिकाटी आणि प्रामाणिकपणा अंगी बाळगत प्रगती करण्यास सुरुवात केली. आपली उपजत व्यायामाची आवड जपत, ओजस जिम नावाने त्यांची आज जिमची फ्रेंचायजी आज पिंपरी चिंचवड शहरात विस्तारत आहे. सध्या काळूरामजी बांधकाम व्यवसात स्थिरावत असुन, ५ गृहप्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेले आहेत. या माध्यमातून माफक दरात सुमारे ५०० पिंपरी चिंचवडकरांना सदनिका उपलब्ध झाल्या आहेत.
काळूरामजी बारणे यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात, गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून झाली. सन १९९७ ते २००८ पर्यंत काळूरामजी थेरगावच्या सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष होते. जिवंत देखावे थेरगावात प्रथम सुरू करण्याचा मान हा सन्मित्र क्रीडा मंडळाला जातो आणि त्यात, काळूरामजी बारणे यांच्या दूरदृष्टीचे योगदान अधिक होते हे इथे विशेषतः सांगावे वाटते. मंडळात उत्कृष्ट काम केल्याने आणि अफाट लोकसंपर्काचे धनी राहिलेल्या काळूरामजी बारणे यांना संपूर्ण थेरगाव 'अध्यक्ष' ह्याच नावाने अजूनही ओळखते ह्यातच त्यांचे गणेशोत्सव आणि तरुणांशी जोडलेली नाळ दिसून येते.
काळूरामजी बारणे यांनी गणेशोत्सव मंडळाच्या सोबतच, २००५ साली शरद नागरी पतसंस्थेचा कारभार चेअरमन म्हणून हातात घेतला. ३० लाख वार्षिक उलाढाल आणि तेव्हाची ड वर्ग नामांकन असलेली पतसंस्था आजमितीला त्यांनी १५ कोटी वार्षिक उलाढालीवर नेऊन ठेवली आहे आणि विशेष म्हणजे २००९-१० पासून, सलग १५ वर्षे पतसंस्थेचा नामांकन अ वर्ग म्हणून स्थिर आहे. त्याचप्रमाणे, सभासदांना १२% लाभांशाचे वितरण देखील नियमित करण्यात येत आहे. संघटन आणि योग्य टीमची बांधणी करणे आणि त्यामाध्यमातून सकारात्मक बदल घडविणे ही काळूरामजी बारणे यांची जणू खासियत आहे.
तरुणांचे संघटन करत असताना, तरुणांच्या सामूहिक शक्तीला संघटनेची जोड ही हवीच ज्यामुळे; विधायक कामाला एक चेहरा-मोहरा प्राप्त होतो ही काळूराम जी यांची भूमिका ..!
त्यामुळे, २००६ साली काळूरामजींचे राजकीय गुरू, स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या समवेत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेरगाव - वाकड ब्लॉक अध्यक्ष म्हणून ते नियुक्त झाले. तळागाळातील प्रत्येक शेवटच्या घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात, काळूरामजी बारणे यांची खऱ्या अर्थाने, चर्चा झाली ती सध्याचे मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार आणि प्रस्थपित नेतृत्व श्री.श्रीरंग बारणे यांच्याविरोधात त्यांनी लढवलेली अटी-तटीची निवडणूक..!! युवकांचा पाठिंबा आणि अफाट लोकसंग्रह यांमुळे स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी श्रीरंग बारणे यांच्या विरोधात काळूराम जी बारणे यांना एक नव्या दमाचा युवक म्हणून, मैदानात उतरवले . काळूरामजी बारणे यांनी आपल्या गुरूंच्या प्रतिष्ठेचा मान राखत, श्रीरंग बारणे यांना कडवी झुंज दिली आणि त्यांना वार्डातच अडकून ठेवले. अगदी निसटता पराभव पदरी पडला असला तरी, काळूरामजी बारणे यांनी दिलेल्या लढतीची तेव्हा, संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात चर्चा झाली होती.
पुढे राजकिय स्थित्यंतरामध्ये स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या समवेत, भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर, चिंचवड-किवळे मंडल अध्यक्ष म्हणून संघटनेत काम सुरू केले. मूळची नाळ ही लोकसंपर्काची आणि अध्यात्मिक बैठकीची असल्याने भारतीय जनता पार्टीशी जुळवून घेणे त्यांना फार अवघड गेले नाही.
स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या २०१७ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेरगाव मधून जबरदस्त स्ट्राईक रेटने ८ पैकी ६ जागा जिंकून आणत, महापालिकेतील भाजप च्या एकहाती सत्तेचा मार्ग सुकर केला. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या देहावासनानंतर, भाजप शहराध्यक्ष झालेल्या आमदार महेश दादा लांडगे यांच्या अध्यक्ष कार्यकाळात त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केले. सध्याचे विद्यमान भाजप शहराध्यक्ष माननीय शंकर भाऊ जगताप यांच्या टीम मध्ये ते भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी निभावत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शहराध्यक्ष मा. शंकर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली ७५ हजाराचे मताधिक्य चिंचवड विधानसभेमधून श्रीरंग बारणे देण्यात काळुरामजी बारणे यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सर्व महत्त्वाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काळुरामजी बारणे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रधानमंत्री घरकुल योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, श्रावणबाळ योजना अश्या अनेक योजनांचा त्यांनी गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. नुकत्याच गाजत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळवून देण्यासाठी शहराध्यक्ष माननीय शंकर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विशेष मेहनत घेतली.
भारतीय जनता पार्टीची, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ही भूमिका शिरसावंद्य मानून आजमितीला पक्षीय जबाबदाऱ्या काळूरामजी बारणे पार पाडत आहे. तीन अपत्य असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळी मधून, ते बाहेर पडले असले तरी, एक पक्षाची संघटनात्मक बांधणीसाठी त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच सध्याचे भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या कोअर टीमचा ते अविभाज्य भाग आहेत.